नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशभरातील अनेक लोकांचा व्यवसाय शेती आहे. या शेती व्यवसायात परिवारातील महिला देखील मोठी मदत करीत असतात त्यामुळे कृषी क्षेत्रात महिलांचे अधिक योगदान सुनिश्चित करण्यासाठी आणि ड्रोनच्या माध्यमातून शेती सुलभ करण्याच्या योजनेंतर्गत देशभरात १५ हजार ‘नमो ड्रोन दीदीं’ना प्रशिक्षित केले जाणार आहे, अशी माहिती केंद्र सरकारने लोकसभेत दिली.
सभागृहात लोकजनशक्ती पक्षाचे सदस्य महबूब अली कैसर यांच्या पूरक प्रश्नाच्या उत्तरादाखल कृषी आणि शेतकरी कल्याणराज्य मंत्री शोभा करंदलाजे यांनी यासंबंधीची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदा लाल किल्ल्यावरून १५ हजार महिलांना ड्रोन प्रशिक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. या ‘नमो ड्रोन दीदी’सोबत एका सहायकालाही प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पद्धतीने एकूण ३० हजार महिलांना ड्रोन प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे करंदलाजे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील ड्रोनच्या तुटवड्याबाबत द्रमुकच्या के. कनिमोई यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना करंदलाजे यांनी यासंदर्भात ड्रोन उत्पादकांना सरकारी मदत दिली जात असल्याचे स्पष्ट केले.
सोबतच एका खासगी कंपनीला ड्रोन पुरवठा करण्यास सांगण्यात आल्याचे त्या म्हणाल्या. तसेच संपूर्ण देशात कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत कृषिबरोबरच विविध क्षेत्रांसाठी प्रशिक्षण दिले जात असल्याचा दावा त्यांनी केला. गत तीन वर्षांत चार कोटी ४८ लाख शेतकऱ्यांना वेगवेगळ्या विभागांकडून प्रशिक्षण देण्यात आल्याचे त्या म्हणाल्या.