चंडीगड : वृत्तसंस्था
पंजाबमध्ये मोगा जिल्ह्यात रविवारी पहाटे गुंडांवरील कारवाई सुरूच असून आणखी एक चकमक झाली. पोलिसांसोबत झालेल्या गोळीबारानंतर लकी पटियाल टोळीच्या तीन गुंडांना अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोगा जिल्ह्याचे पोलिस उपअधीक्षक हरिंदर सिंग यांनी सांगितले की, दुचाकीवर आलेल्या गुंडांना बॅरिकेडस लावून थांबविण्याचा प्रयत्न केला. पण, हा गुंड पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना जखमी झाला. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. त्यानंतर ते दुचाकी सोडून शेतात गेले आणि पोलिसांवर गोळीबार केला. गोळीबारानंतर गुंडांनी आत्मसमर्पण केले. त्यांच्यापैकी एक पळून जाण्याचा प्रयत्न करताना जखमी झाला, परंतु गोळीबारात नाही. अटक करण्यात आलेल्या गुंडांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबमध्ये गेल्या ११ दिवसांत घडलेली ही आठवी चकमक आहे. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही दिवसांपूर्वीच इशारा दिला होता की, पोलिसांवर हल्ला झाल्यास पोलिस जोरदार प्रत्युत्तर देतील.