ध्यास विश्वसार्ह बातमीचा

राज्यात तापमानाचा पारा घसरला तर थंडी वाढू लागली !

मुंबई : वृत्तसंस्था

उत्तर भारतात काश्मीर, पंजाब हिमाचल प्रदेशसह राजस्थानमध्ये थंडीची लाट आली असून तिकडून महाराष्ट्राकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात सलग दुसऱ्या दिवशी उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात थंडीचा कडाका वाढला होता. उत्तर भारतातील थंडी महाराष्ट्राच्या दिशेने सरकल्याने राज्यात किमान तापमानात घट झाली आहे. मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्र गारठला आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला आहे. रविवारी राज्याच्या अनेक भागात गारठा कायम होता. तर राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण होते. नाशिक जिल्ह्यात यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच पारा 10 अंशाखाली उतरला असून ओझरमध्ये रविवारी राज्यातील नीचांकी 9 अंश, तर संभाजीनगरात 14 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. आता आगामी दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहणार असून उर्वरित राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्याच्या किमान तापमानात घट कायम असल्याने अनेक ठिकाणी तापमानाचा पारा 14 अंशांच्या खाली आहे. डिसेंबर महिन्याच्या मध्यावर राज्यात थंडीची प्रतिक्षा संपली आहे. राज्याच्या उत्तरेकडील भागात गारठा अधिक असून, दक्षिणेकडील जिल्ह्यात मात्र किमान तापमान अद्यापही 15 अंशांच्या वरच आहे. विदर्भाच्या किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!