पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर : तुमच्या सोशल मीडियावर असेल नजर !
अक्कलकोट शहरासह तालुक्यात आता होणार कारवाई
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावरून घडलेल्या घटनांवरून पोलीस ॲक्शन मोडवर दिसत आहेत.या पार्श्वभूमीवर पोलिसांची सोशल मीडियावर आता करडी नजर राहणार आहे. आगामी निवडणुका ,मराठा आंदोलन आणि सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांकडून ही खबरदारी घेतली जात आहे. शनिवारी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतमकुमार यावलकर यांनी आढावा बैठक घेतली होती.
या बैठकीत देखील सर्वांनी सोशल मीडियावर टीका टिप्पणी करत या विषयाकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.यानंतर पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी यावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.सध्या निवडणुका कोणत्याच नाहीत परंतु येत्या काळामध्ये लोकसभा विधानसभा नगरपरिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक येणार आहेत.त्या दृष्टीने सर्व पक्षाचे कार्यकर्ते हे आपापल्या नेत्यांचे समर्थन करत सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होत आहेत.आपल्या नेत्यांनी केलेली कामे आणि पोस्टर्स, बॅनर्स सोशल मीडियावर शेअर करून आपल्या नेत्यांचा प्रचार करण्यात ते गुंतले आहेत.
परंतु हे करत असताना इतरांवर वैयक्तिक टीका टिप्पणी न करता ते आपल्या पक्षाचा प्रचार करणे अपेक्षित आहे परंतु तसे न करता एकमेकांवर ते घसरत असल्याने दोन्ही पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरी तुम्हारी आणि तू तू .. मैं मैं असे प्रकार होत आहेत हा प्रकार जर टाळायचा असेल तर नेते मंडळींनी देखील आपापल्या कार्यकर्त्यांवर अंकुश ठेवायला हवा, अशा प्रकारची चर्चा शांतता कमिटीच्या बैठकीत झाली होती. यावर अंमलबजावणी होते का ते देखील आता पाहावे लागेल परंतु पोलीस तरी सध्या सोशल मीडियावरती प्रचंड लक्ष ठेवून आहेत. बऱ्याच वेळा एखाद्या नेत्याचा किंवा पदाधिकाऱ्यांचा कसल्याही प्रकारचा संबंध नसताना एखादा अल्पवयीन कार्यकर्ता एखादी पोस्ट टाकून समाज मन दुखावण्याचा प्रयत्न करतो अशावेळी पुन्हा त्या ठिकाणी राजकारण आडवे येते अशावेळी राजकारणाने त्यामध्ये पडू नये तरच हा प्रकार टाळू शकतो. तालुक्यात शांतता आबाधीत ठेवण्यासाठी प्रत्येकानेच आपापल्या कार्यकर्त्यावर अंकुश ठेवून एक प्रकारची आचारसंहिता पाळावी,असे आवाहन पोलिसांनी केले आहे अन्यथा कायद्याचा धाक दाखवून सर्वांना सरळ केले जाईल,असा इशारा पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिला आहे.
विनाकारण तरुण मुले अडकतील अनेक तरुण हे अजून शाळा शिकत आहेत काही तरुण महाविद्यालयाला जात आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणाचे तरी ऐकून काहीतरी पोस्ट करून विनाकारण आपल्यावर गुन्हे दाखल करून घेण्यापेक्षा आपले करिअर बाद करून घेण्यापेक्षा आपण आपले सुरक्षित आणि सुखी आनंद जीवन जगावे असे म्हणणे पोलिसांचे आहे.
अन्यथा पोलिसी खाक्या दाखवू …
यापुढे कोणत्या का पक्षाचा कार्यकर्ता असेल जर कोणी आक्षेपार्ह पोस्ट केली आणि यातून काही अप्रिय घटना घडली तर त्यांना सोडले जाणार नाही.पोलिसी खाक्या त्यांना दाखविला जाईल या सर्व घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अक्कलकोटचे पोलीस आता सज्ज आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार हे देखील या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.
– जितेंद्र कोळी,पोलीस निरीक्षक