मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत संपत आली असतांना देखील मंत्री छगन भुजबळ व मनोज जरांगे यांच्यातील वाद अद्याप शमला नाही. भुजबळांनी जरांगेंच्या दारू पिवून किडन्या सडल्याची तिखट टीका भुजबळांनी केली होती. त्यावर आता जरांगेंनी आपली नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे. मी आतापर्यंत दारूला शिवल्याचे सिद्ध झाले तर मी जिवंत समाधी घेईन, असे ते म्हणालेत.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, छगन भुजबळांनी माझ्या किडन्या दारूमुळे सडल्याचा आरोप केला आहे. माझी नार्को टेस्ट करा. त्यात मी जन्मल्यापासून आतापर्यंत कधी दारू पिल्याचे स्पष्ट झाले तर मी जिवंत समाधी घेईन. अन्यथा त्यांनी घ्यावी. आमच्याकडेही त्यांची माहिती आहे. मी ती जाहीर केली तर त्यांना सर्वकाही सोडून हिमालयात जावे लागेल. भुजबळांच्या 2-3 वाईट घटना पुरव्यांसकट मला माहिती आहेत.
मनोज जरांगे यांनी यावेळी सरकारला मराठा आरक्षणाचा कायदा तातडीने पारीत करण्याचे आवाहनही केले. माझे उपोषण सोडताना जे ठरले होते ते सरकारने प्रामाणिकपणे द्यावेत. सभागृहात मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा, असे ते म्हणाले. सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची भाषा करत आहे. पण स्वतंत्र आरक्षण टिकण्याची फार कमी शक्यता आहे. त्यामुळे स्वतंत्र म्हणजे कसे? हे देखील सरकारने स्पष्ट करावे, असे जरांगे म्हणाले.