लोकसहभागाचे कामे गावाला प्रगती पथावर नेते ; तहसीलदार सिरसट !
बागेहळ्ळी येथे पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून पूर्ण
अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लोकसहभागातून होणारे काम गावाला प्रगतीपथाकडे नेते, असे प्रतिपादन तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले.बागेहळ्ळी (ता.अक्कलकोट )येथे दोन किलोमीटर पाणंद रस्त्याचे काम लोकवर्गणीतून केले गेले . लोकसहभागातून झालेले काम उत्तम दर्जाचे झाले आहे. गावकऱ्यांनी कोणतेही काम मनावर घेतल्यास विकास व्हायला वेळ लागणार नाही यासाठी सर्वांनी एकत्रित येणे गरजेचे आहे.
जटिंगराया मंदिरापासून २ किलोमीटरचा हा पाणंद रस्ता आहे. लोकसहभागातून निर्माण झालेल्या या रस्त्याचे लोकार्पण तहसीलदार बाळासाहेब सिरसट यांनी केले. अध्यक्षस्थानी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले होते. पाणंद रस्ता अतिशय खराब झाला होता. चालत जाणे देखील मुश्किल झाले होते अशावेळी लोकांनी पुढाकार घेऊन काम पूर्ण केल्याबद्दल अमोलराजे भोसले यांनी समाधान व्यक्त केले आणि गावच्या विकासासाठी सहकार्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी बाबासाहेब निंबाळकर, शिरिष पाटील,स्वामीराव शिंदे, धोंडिबा सिरसट, प्रकाश माशाळे शिवनिंगप्पा ठाणेदार, कुमार माशाळे,मंडल अधिकारी भासगी, तलाठी अनंत शिंदे उपस्थित होते.मान्यवरांचा सत्कार ग्रामपंचायत आणि स्वामी समर्थ विश्रांती धाम मंदिर समितीवतीने करण्यात आला.