ध्यास विश्वसार्ह बातमीचा

११११ किलो फळ : दत्त जयंतीदिनी असा दाखविणार नैवेद्य !

श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाचा स्तुत्य उपक्रम

अक्कलकोट : प्रतिनिधी

येथील श्री स्वामी महाराजांच्या वटवृक्ष मंदिरात यंदा श्री स्वामी समर्थ सेवा सार संघाच्यावतीने २६ डिसेंबर रोजी अनोखी दत्त जयंती साजरी करण्यात येणार आहे.यावेळी श्री स्वामींना ११११ किलोचा विविध फळांचा नैवेद्य दाखवण्यात येणार आहे,अशी माहिती संस्थेचे प्रमुख स्वामी वृंदावन दास (पुणे) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

गेल्या अकरा वर्षांपासून या संस्थेमार्फत दरवर्षी दत्त जयंती व अन्य उत्सवाच्या निमित्ताने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत.यापूर्वी १५१ किलोचा केक दत्त जयंतीच्या निमित्ताने कापण्यात आला होता.सर्व प्रकारचे ज्यूस, लाडूचा महाप्रसाद, ज्ञान सेवा इत्यादी कार्य समितीकडून सुरू आहे.स्वामी नामाचा शास्त्रोक्त पद्धतीने प्रसार व्हावा यासाठी ‘स्वामी आणि मी’ या विषयावरचे क्लासेस पण दर शनिवारी आणि रविवारी अक्कलकोटमध्ये घेण्यात येत आहेत. स्वामी सेवेचे हे अखंड कार्य राज्य भरामध्ये सुरू आहे.यावर्षी ११११ किलोचा फळांचा नैवेद्य असून यात स्ट्रॉबेरी,सफरचंद, केळी, पेरू, चिकू, डाळिंब, संत्री इत्यादी ३२ प्रकारचे फळे यात समाविष्ट राहणार आहेत.

काकड आरतीनंतर स्वामींना हा नैवेद्य दाखविण्यात येईल तसेच इतर सात ठिकाणी हक्कयाचा मारुती,समाधी मठ, मुरलीधर मंदिर ,गुरु मंदिर, शेख नूरदिन बाबा दर्गा,खंडोबा मंदिर या ठिकाणी नैवेद्य दाखवण्याचा कार्यक्रम होणार आहे त्यानंतर सकाळी ११ वाजता स्वामी आणि मी हा महाकिताब ११ स्वामींच्या सेवेकरींना भेट देण्यात येणार आहे.या कार्यक्रमाला वटवृक्ष देवस्थानचे अध्यक्ष महेश इंगळे,माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, सुधीर माळशेट्टी,केदार माळशेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी गणेश बाराटक्के, मोहन चव्हाण आदि उपस्थित होते.

स्वामी नामाचा प्रसार
दिवसेंदिवस स्वामीनामाचा जयघोष आणि भक्तीचा महिमा हा जगभर पसरत आहे. स्वामींची भक्ती आणि श्री दत्त संप्रदायाचा मूळ गाभा हा शास्त्रोक्त पद्धतीने भक्तांपर्यंत पोहोचावा यासाठी आमच्या संस्थेचे काम सुरू आहे त्यातूनच यावर्षी हा कार्यक्रम आम्ही घेणार आहोत.स्वामी भक्तांनी याला सहकार्य करावे.
– स्वामी वृंदावन दास,संस्था प्रमुख

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!