अयोध्या : वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी अयोध्या दौऱ्यावर असून रामजन्मभूमी फुलांची आरास, भित्तीचित्रे, रोषणाईने सजली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान अयोध्येतील पुनर्विकसित रेल्वे स्थानक, नव्या विमानतळाचे उद्घाटन करणार आहेत. याशिवाय उत्तर प्रदेशसाठी १६ हजार कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात येईल. मोदी अयोध्येत एक एक क रा रोड शो करणार असून, एका सभेलादेखील संबोधित करणार आहेत. मोदींच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यापूर्वी होणाऱ्या मोदींच्या या अयोध्या दौऱ्याला भव्यदिव्य स्वरूप देण्यात येत आहे. पंतप्रधान सकाळी पावणे अकराच्या सुमारास अयोध्या विमानतळावर दाखल होतील. शंखनाद व डमरू वाजवून मोदींचे स्वागत करण्यात येईल. ३० लोककलाकार लोककला सादर करतील. यानंतर पंतप्रधान पुनर्विकसित अयोध्या रेल्वे स्थानकाच्या उद्घाटनाला रवाना होतील. विमानतळ ते रेल्वे स्थानकादरम्यान मोदींचा रोड शो आहे. या मार्गात ४० ठिकाणी व्यासपीठ उभारण्यात आली असून, सुमारे १४०० कलाकार सांस्कृतिक कार्यक्रम सादर करतील. अयोध्या रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यात आला आहे. तसेच अयोध्या जंक्शनचे नाव बदलून ‘अयोध्या धाम जंक्शन’ करण्यात आले आहे. नागर शैलीतील मंदिरांप्रमाणे बांधण्यात आलेले हे स्टेशन मुकुट, धनुष्यबाण यासह विविध धार्मिक प्रतीकांनी सुशोभित केले आहे.
रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान देशातील पहिल्या दोन अमृत भारत एक्स्प्रेस आणि ६ वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. रेल्वे स्थानकाहून पुन्हा विमानतळावर परतून मोदी अयोध्येतील या पहिल्या विमानतळाचे उद्द्घाटन करतील. ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम’ असे या विमानतळाचे नामकरण करण्यात आले आहे. १४५० कोटी रुपये खर्चुन हे विमानतळ बांधण्यात आले आहे. विमानतळाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान एका सभेला संबोधित करतील, तसेच उत्तर प्रदेशसाठी सुमारे १५ हजार ७०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण करतील. पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे. सुमारे ३०० क्विंटल फुलांनी शहरात प्रभू श्रीराम, त्यांचे धनुष्यबाण यांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. शहरात ठिकठिकाणी मोदींच्या स्वागतासाठी मोठमोठी पोस्टर्स लावण्यात आली आहेत.
उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, रेल्वेमंत्री अश्विनीकुमार, नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया तसेच स्थानिक खासदार, आमदार या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.