पुणे : वृत्तसंस्था
देशभरात यंदाच्या वर्षात अनेक निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. त्या अनुषंगाने सर्वच पक्ष तयारीला लागलेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याचे नमूद केले. तसेच विरोधी पक्ष आक्रमकपणे निवडणुकीच्या रणांगणात उतरणार असल्याचे संकेत दिले.
काही दिवसांपूर्वी दिल्लीत शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीलाी सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते उपस्थित होते. त्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला. त्यावर अनौपचारिकपणे शिक्कामोर्तबही झाला आहे. केवळ त्याची अधिकृत घोषणा बाकी आहे. ही घोषणा पुढील 8-10 दिवसांत होईल, असे सुप्रिया सुळे यांनी सोमवारी याविषयी बोलताना सांगितले आहे.
दुसरीकडे, शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही या प्रकरणी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, पुढील 1-2 दिवसांत महाविकास आघाडीच्या जागावाटपाचे चित्र स्पष्ट होईल. तिन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची दिल्लीत बैठक झाली. त्यानंतर काँग्रेसच्या पक्षांतर्गत बैठका झाल्या. तिन्ही पक्ष या प्रकरणी पुन्हा एकत्र बसतील. चालू आठवड्यात सर्व गोष्टी ठरतील असा मला विश्वास आहे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.