नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय तरुण पिढी धाडसी असून हेच तरुण नवे विश्व बनवत आहेत, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. आपल्या देशातील नवसंशोधकांना पेटंट मिळण्याची संख्या २०१४ मध्ये अवघी ४,००० होती. ती वाढून आता ५०,००० च्या घरात पोहोचली आहे. यावरून देशात उच्च प्रतिभेचे संशोधक घडत असल्याचे सिद्ध होत आहे, असे मोदींनी सांगितले.
तामिळनाडूतील भारतीदासन विद्यापीठाच्या ३८ व्या दीक्षांत समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, भारतीय वैज्ञानिकांनी चांद्रयान मोहिमेच्या माध्यमातून जगाच्या नकाशावर आपले नाव कोरले. नवसंशोधकांना पेटंट मिळणाऱ्यांची संख्या ५०,००० झाली. मानव विद्याशाखेतील विद्वान जगापुढे भारताची यशोगाथा मांडत आहेत. संगीतकार व कलाकार सातत्याने आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवत आहेत. यामुळे देशाच्या शिरपेचात मानाचे तुरे रोवले जात आहेत, असे नरेंद्र मोदींनी नमूद केले.
भारताचा उदय होण्यामागे विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे. नालंदा व विक्रमशिलासारखी प्राचीन विद्यापीठे ज्ञानार्जनासाठी प्रसिद्ध आहेत. कांचीपुरम विद्यापीठ व मदुराईसुद्धा शिक्षणाचा केंद्रबिंदू बनत असल्याचे मोदींनी सांगितले. दरम्यान, १९८२ साली स्थापन झालेल्या भारतीदासन विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला संबोधित करणारे नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांशी हितगुज केले. दिल्लीला येण्यास कोण कोण इच्छुक आहे? असा सवाल मोदींनी केला. त्यास दोन विद्यार्थ्यांनी हात उंचावून होकार दिला.