पुणे : वृत्तसंस्था
देशभरातील लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवूनच बांधकाम अपूर्ण असतानाही अयोध्येतील मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. हे न पाप असल्याचे शंकराचार्यांनी सांगितले असून, भाजपने प्रभू श्रीरामापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मोठे केले आहे, अशी जहरी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत केली.
पुणे दौऱ्यावर असताना, काँग्रेस भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पटोले यांनी राममंदिर उभारणीवरून भाजपवर टीका केली. ते म्हणाले की, मी पण हिंदू आहे. भाजपचे नेते विविध मान्यवरांना राममंदिराचे निमंत्रण देण्यास जात आहेत. या मंदिराचे काम पूर्ण झाले नाही, तरीही तेथे प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात आहे. हे चुकीचे असल्याचे शंकराचार्य यांनी भाजपच्या नेत्यांना सांगितले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवत भाजपने हा प्रकार चालवला आहे. यासंदर्भात भाजपकडून केल्या जाणाऱ्या प्रसारात प्रभू श्रीरामापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच मोठे असल्याचे भासवले जात आहे.