अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
बहुचर्चित एकरूख उपसा सिंचन योजनेचे पाणी शेवटी कुरनूर धरणात पोहोचलेच नाही त्याआधीच पाटबंधारे विभागाने पाणी बंद केल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे.या योजनेवरून तालुक्यात मोठा श्रेयवाद झाला परंतु किमान पाणी तरी धरणामध्ये पोहोचायला पाहिजे होते अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. तालुक्यात २७ वर्षानंतर उजनीच्या पाण्याचा प्रवेश झाला परंतु यावर्षी उजनीमध्येच पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाणी धरणात पोहोचेल की नाही याबाबत सुरुवातीपासूनच साशंकता होती.तरीही पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला होता.यानंतर दक्षिणमधील दर्गनहळळी आणि रामपूरमध्ये काही प्रमाणात पाणी सोडण्यात आले.त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये दर्शनाळ कालव्याद्वारे कुरनूरमध्ये पाणी पोहोचेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र हन्नूरच्या थोडे पुढे पाणी पोहोचले त्यानंतर पाटबंधारे विभागाने पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला.त्यामुळे पहिल्याच वर्षी धरणामध्ये पाणी पोहोचू शकले नाही. पाणी धरणामध्ये पोहोचले नसले तरी बोरी नदीत पोचले असा दावा प्रशासनाने केला आहे.सध्या अक्कलकोट तालुक्यात दुष्काळी स्थिती आहे अशा उजनीच्या पाण्याचा आधार मिळेल आणि चित्र बदलेल अशी आशा शेतकऱ्यांना होती मात्र तसे काही घडू शकले नाही त्यात पाणी सोडतेवेळी अनेक अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या अडचणीवर मात करत पाटबंधारे विभाग देखील शर्थीचे प्रयत्न करून धरणामध्ये पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते परंतु हे पाणी पोचू शकले नाही.आता राज्य सरकारने दर्शनाळ कालव्याच्या उर्वरित कामांनाही मंजुरी दिली आहे त्यामुळे पुढील वर्षभरात ही कामे पूर्ण होऊन किमान पुढच्या वर्षी तरी पाणी मोठ्या प्रमाणात या योजनेद्वारे अक्कलकोट तालुक्याला मिळावे,ही चर्चा देखील शेतकऱ्यांमध्ये सध्या सुरू आहे.
पाण्याचा प्रश्न गंभीर होणार
यावर्षी दुर्दैवाने कुरनूर धरण देखील १०० टक्के भरलेले नाही त्यामुळे आता खालच्या शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे यावर्षी बोरी नदीवरच्या आठ कोल्हापुरी बंधाऱ्यात देखील पाणी पोहोचू शकणार नाही केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे भविष्यकाळात पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे.