मुंबई: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मंगळवारी रात्री दोन दिवसीय मुंबईच्या दौऱ्यावर आले. उत्तर प्रदेशातही फिल्म सिटी तयार करणार असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं होतं. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम बॉलिवूडचा अभिनेता अक्षय कुमार याची भेट घेतली. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
देशात फिल्मसिटी काय फक्त मुंबईतच आहे का? तामिळनाडूतही फिल्मसिटी आहे. तिकडेही उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जाणार आहेत का? की त्यांनी केवळ मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवालही राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा सवाल केला.
योगी आदित्यनाथ हे साधू आहेत. महाराज आहेत. उत्तर प्रदेशात फिल्मसिटी उभी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानिमित्ताने ते काही कलाकारांना भेटले. अक्षयकुमारलाही भेटले. अक्षयकुमार कदाचित त्यांना आंब्याच्या पेट्या घेऊन गेला असेल, अशी कोपरखळी लगावतानाच मुंबईतील फिल्मसिटी एका रात्रीत उभी राहिलेली नाही. अनेक वर्षाची मेहनत आणि कष्ट त्यामागे आहेत. योगी मुंबईत आले. तसे तामिळनाडूतही जाणार आहेत का? तिकडेही मोठी फिल्मसिटी आहे. की फक्त योगींनी मुंबईशीच पंगा घेतलाय?, असा सवाल राऊत यांनी केला.