राजस्थानमध्ये एक धक्कादायक दुर्घटना घडली. ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. या दुर्घटनेमध्ये एका महिलेसहीत दोन जणांचा दूर्देवी मृत्यू झाला. या अपघातात १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना पाली जिल्ह्यातील सांडेराव पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडलीय.
चार पदरी रस्त्याच्या बाजूने गॅसची पाईपलाइन टाकण्याचं काम सुरु होतं. मंगळवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मारवाड जंक्शनवरुन पुण्याच्या दिशेने एका खासगी प्रवाशी बस जात होती. त्याचवेळी एक ८० फुटांचा लांब पाईप दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम सुरु होतं. हायड्रॉलिक मशीनच्या ऑप्रेटरकडून झालेल्या चुकीमुळे हा ८० फुटांचा गॅस पाईप थेट रस्त्यावरुन जाणाऱ्या बसच्या आरपार गेला. या अपघातामध्ये एका प्रवाशाचे डोकं आणि धड वेगळं झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एका प्रवाशाच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाल्याने त्याचाही मृत्यू झाला. या अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. बसमधून आरपार गेलेल्या गॅस पाईपचे फोटो पाहूनच हा अपघात किती भीषण होता याचा अंदाज येतो.
बसमधील भंवरलाल प्रजापत आणि मैना देवी देवासी यांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही ईसाली गावाचे रहिवाशी होते. या दोघांव्यतिरिक्त १२ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर सांडेराव पोलीस स्थानकातील अधिकारी धोलाराम परिहार यांच्यासहीत पोलिसांची एक तुकडी घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी जखमींना जवळच्या आरोग्य केंद्रावर पोहचवलं. या अपघातानंतर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.