ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाणी टंचाईचा फटका : राज्यातील ऊस लागवड ठप्प !

पुणे : वृत्तसंस्था

पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्याचा फटका ऊस लागवडीला बसला आहे. आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडी ठप्प झाल्याचे चित्र दिसून येत आहे. उसाच्या आगारात आतापर्यंत आडसाली, पूर्वहंगामी उसाच्या अवघ्या ४ लाख २८ हजार ३८ हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. त्यातच उन्हाळ्यात उपलब्ध झालेला ऊस चाऱ्यासाठी जाणार असल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अडचणीत येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. त्यातच ऑक्टोबरमध्ये पडलेल्या कडक उन्हामुळे जमिनीत पुरेशी ओल नसल्याने ऊस लागवडी कमी प्रमाणात झाल्या आहेत. यंदा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेल्याची स्थिती असताना पाण्याची उपलब्धता असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले आहे.

राज्यात सरासरीच्या १० लाख ९५ हजार ७५ हेक्टरपैकी ४ लाख २८ हजार ३८ हेक्टर म्हणजेच ३९ टक्के क्षेत्रांवर ऊस लागवडी झाल्या आहेत. बहुतांशी शेतकरी दर वर्षी आडसाली उसाच्या लागवडी १५ जुलै ते १५ ऑगस्टदरम्यान करतात. पूर्वहंगामी उसाच्या १५ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सुरू उसाच्या लागवडी सुरू असून, पाण्याअभावी त्यासुद्धा खोळंबल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात ६ लाख ४ हजार ३८५ हेक्टर म्हणजेच ५५ टक्के लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी तब्बल १ लाख ७६ हजार ३४७ हेक्टरने घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता अनेक ठिकाणी पाणीटंचाई भेडसावू लागल्याने ऊस लागवडी होण्याची शक्यता कमी झाली आहे.

दरवर्षी शेतकरी आडसाली, पूर्वहंगामी, सुरू अशा तीन हंगामांत उसाच्या लागवडी करतात. आडसाली उसाच्या लागवडी केल्यानंतर साधारणपणे १५ ते १७ महिन्यांनी ऊस कारखान्याला तोडणीस देतात. यंदा उसाचे आगार असलेल्या पुणे, नगर, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत ऊस लागवडी घटल्याचे चित्र आहे. मराठवाडा व विदर्भातही फारशा लागवडी झालेल्या नाहीत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!