अहमदाबाद : वृत्तसंस्था
देशात प्रत्येक रेल्वे प्रवाशाला पूर्वीप्रमाणेच तिकिटात ५५ टक्क्यांची सवलत दिली जात आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांना रेल्वे तिकीट दरात मिळणारी सूट कायम करण्याच्या मागणीवर बोलताना त्यांनी अप्रत्यक्षरीत्या प्रवाशांना तिकिटात सवलत दिली जात असल्याचे सांगितले.
महत्त्वाकांक्षी मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची समीक्षा करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव अहमदाबादच्या दौऱ्यावर आले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित केले. ज्येष्ठ नागरिक व पत्रकारांसाठी ५० टक्के सवलत बंद करण्याविषयी पत्रकारांनी सवाल विचारला, त्यास उत्तर देत रेल्वेमंत्री तिकिटात ५५ टक्क्यांची सवलत मिळत आहे. एखाद्या प्रवाशाला गंतव्य स्थळी जाण्यासाठी १०० रुपये तिकीट असल्यास केवळ ४५ रुपये वसूल केले जात आहे. यात प्रत्येक प्रवाशाला ५५ रुपयांची सवलत दिली जात आहे, असे सांगत रेल्वेमंत्र्यांनी वेळ मारून नेली. दरम्यान, मार्च २०२० मध्ये कोरोना महामारीच्या काळात लॉकडाऊन लागू करण्यापूर्वी ज्येष्ठ नागरिक व मान्यताप्राप्त पत्रकारांना तिकीट दरात ५० टक्क्यांची सूट दिली जात होती. पण, लॉकडाऊननंतर ही सवलत बंद करण्यात आली. जून २०२२ मध्ये रेल्वे सेवा पूर्ववत झाल्यानंतर ५० टक्के सूट लागू करण्यात आली नाही. विरोधकांनी हा मुद्दा संसदेत अनेकदा उचलून धरला. मात्र, सरकारने ही सवलत पर्ववत केली नाही.