ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तीन नगरपालिका, ३५ गावे पाण्याअभावी संकटात

४ हजार हेक्टरवरील बागायती पिके धोक्यात, अभूतपूर्व स्थितीची शक्यता

अक्कलकोट : मारुती बावडे

यंदा पावसाअभावी कुरनूर धरणात केवळ १८ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे त्यामुळे ४ हेक्टरवरील बागायत क्षेत्र धोक्यात आले असून तीन नगरपालिका आणि ३५ गावांचा पाणीपुरवठा संकटात सापडला आहे यामुळे तालुक्यात एप्रिल महिन्यातच अभूतपूर्व पाणीटंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.याबाबत प्रशासनाने आत्तापासूनच नियोजन करण्याची गरज आहे.

अक्कलकोट तालुका तसा दुष्काळी तालुका. परंतु कुरनूर धरणामुळे काही प्रमाणात सिंचन क्षेत्र निर्माण झाले.दरवर्षी धरण भरल्यानंतर दोन वेळा पाण्याचे रोटेशन पूर्ण केले जाते या पाण्यातून साधारण ४ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येते.१७ हजार हेक्टरची जी आकडेवारी आहे ती उजनीचे पाणी आल्यानंतर सिंचनाखाली येणार आहे परंतु यावर्षी कुरनूर धरणच न भरल्यामुळे या सर्वच क्षेत्रातील पिके धोक्यात आली आहेत सध्या धरणात केवळ १५४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे. २०२२ मध्ये धरण जून महिन्यातच ओव्हर फ्लो झाले होते त्यानंतर २०२३ मध्ये सुरुवातीच्या तीन महिन्यांमध्ये पाणी येईल असे वाटत होते

परंतु पावसाळ्याचे तिन्ही महिने कोरडे गेल्याने शेवटच्या सप्टेंबर महिन्यामध्ये थोड्या फार प्रमाणात पाणीसाठा होऊन धरणाने २५ टक्केची पाणीपातळी देखील गाठली नव्हती त्यामुळे आता पुढे काय होणार याची चिंता सर्वांनाच तालुक्याला सतावत आहे. दरवर्षी धरण १०० टक्के भरल्यानंतर दोन वेळा पाणी सोडले जाते यावर्षी पाणी सोडण्याचा विषयच नाही जे पाणी शिल्लक आहे ते केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेला आहे त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या खालच्या २८ गावांचा आणि वरच्या ७ गावांचा पाणी प्रश्न गंभीर होणार आहे यात अक्कलकोट, दुधनी आणि मैंदर्गी या तीन नगरपालिकांचा पाणीपुरवठा बोरी नदी वरून होतो त्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. उपलब्ध १८ टक्के पाणी फेब्रुवारी अखेर किंवा मार्च अखेर पर्यंत जाण्याची शक्यता प्रशासनाने वर्तवलेली आहे त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यात अभुतपूर्व पाणीटंचाईला सामोरे जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.कुरनूर धरणाचा आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास २००५ पासून धरण दोन वेळा कोरडेठाक पडले आहे यावेळी एप्रिल महिन्यात धरण कोरडे पडणार आहे निर्मितीपासून अशा प्रकारची स्थिती निर्माण होण्याची ही तिसरी वेळ असेल.

कुरनूर धरण हे केवळ निसर्गावर अवलंबून आहे निसर्गाने दगा दिला तर अशी स्थिती निर्माण होते त्यात खास करून तुळजापूर तालुक्यात जर पाऊस पडला नाही तर अशा प्रकारच्या स्थितीला तालुक्यातील जनतेला सामोरे जावे लागते म्हणून १९९८ साली युती शासनाच्या काळात या धरणाला एकरूख उपसा सिंचन योजनेद्वारे उजनी धरणातून पाणी देण्याची तरतूद करण्यात आली आहे या योजनेचे पाणी तब्बल २७ वर्षानंतर कुरनूर धरणात पडेल अशी आशा निर्माण झाली होती परंतु तांत्रिकदृष्ट्या या योजनेतील काही अडचणींमुळे केवळ या योजनेची चाचणी झाली असे म्हणावे लागेल परंतु खऱ्या अर्थाने या धरणामध्ये पाणी येऊन शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकला नाही.पुढच्या वर्षी मात्र धरणात नक्की पाणी पडण्याची आशा निर्माण झाली आहे या सगळ्या परिस्थितीमुळे तालुक्यातील कारखानदारी संकटात सापडणार आहे अक्कलकोट तालुक्याच्या ऊसक्षेत्रावर चार ते पाच कारखाने अवलंबून आहेत जर कुरनूर धरणातील पाणी खाली सोडले नाही तर पुढच्या वेळच्या हंगामावेळी ऊस क्षेत्र घटणार आहे यावर्षी ऊस गेल्यानंतर पुढच्या वेळेस पाणीच मिळणार नाही त्यामुळे उसाचे क्षेत्र मोडीत निघण्याची शक्यता आहे परिणामी शेतकऱ्यांना याचा आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसण्याची शक्यता आहे यावर्षी धरणातच पाणी नसल्याने उन्हाळ्यात प्यायला पाणी मिळेल की नाही अशी शंका आहे त्यामुळे प्रशासनाने या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून त्याचाही कृती आराखडा तयार करून निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी उपाययोजना कराव्यात,अशी मागणी तालुक्यातून होत आहे.

ऊस क्षेत्र निम्म्याने घटणार
कुरनूर धरणामुळे आणि भीमा नदीकाठच्या परिसरामुळे तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली परंतु यावर्षी सर्वत्र दुष्काळी स्थिती निर्माण झाल्यामुळे पुढच्या वेळी उसाच्या क्षेत्रात निम्म्याने घट होणार आहे याचा फटका शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या तर बसेलच पण आर्थिक नियोजन देखील कोलमडणार आहे.

धरण उशाला कोरड घशाला अशी स्थिती
दुर्दैवाने कुरनूर धरणाची परिस्थिती अशी असल्यामुळे किमान उजनी धरणातून तरी पाणी या धरणामध्ये येईल अशी मोठी अपेक्षा शेतकऱ्यांची होती परंतु यावेळी उजनी धरण देखील १०० टक्के न भरल्यामुळे त्याची अवस्था अत्यंत वाईट आहे त्यामुळे धरण उशाला कोरड घशाला अशीच अवस्था सध्या तरी शेतकऱ्यांची झालेली आहे.

पाण्याचे नियोजन करण्याची गरज
कुरनूर धरणावरती आणि बोरी नदी वरती जी गावे अवलंबून आहेत त्या गावच्या लोकप्रतिनिधींनी व प्रशासनाने पाणीटंचाई निर्माण होणार नाही या भ्रमात राहू नये. कारण धरणामध्ये पाणी नसल्यामुळे तीव्र पाणी टंचाई निर्माण होऊ शकते त्यामुळे मे आणि जून महिन्यातील संभाव्य स्थिती लक्षात घ्यावी आणि त्यात जर गेल्या वर्षी प्रमाणे पावसाळा लांबला तर याहून बिकट स्थितीला सामोरे जावे लागणार आहे हे गृहीत धरून उपलब्ध पाण्याचे नियोजन अधिकाऱ्यांनी चांगल्या प्रकारे करावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!