मुंबई : वृत्तसंस्था
देशात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वीच कॉंग्रेस व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप होवू लागले आहे. भाजपची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे ४० पेक्षा जास्त खासदार निवडून येतील, असे भाजपच्याच सव्र्व्हेमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे दुसऱ्या पक्षातील नेत्यांना प्रलोभने देऊन आपल्याकडे खेचण्याचा केविलवाणा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, लोकसभा निवडणुकीत होणाऱ्या पराभवाच्या भीतीने भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. महाराष्ट्रातून निवडून कसे यायचे हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न आहे. भाजपला काहीही करून सत्ता मिळवायची आहे. त्यासाठी ते काँग्रेसच्या नेत्यांना गळ घालण्याचा प्रयत्न करत आहेत. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनाही भाजपने ऑफर दिली आहे, मात्र ते काँग्रेस सोडून जाणार नाहीत, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला आहे. माजी खासदार मिलिंद देवरांबद्दल बोलताना पटोले म्हणाले, देवरा कुटुंब ५० वर्षांपेक्षा जास्त काळ काँग्रेसमध्ये होते, विविध पदे भूषवली, खासदार झाले, मंत्री झाले त्यावेळी त्यांना काँग्रेस नकारात्मक आहे असे वाटले नाही. देवरा यांचा व्यक्तिगत विकास थांबला होता म्हणून ते सत्तेसोबत गेले आहेत.