पुणे : वृत्तसंस्था
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना वाटत असेल ३० वर्ष सत्ता राहावी, पण जनता निर्णय घेत असते. मला पण वाटते एकनाथ शिंदे ३० वर्ष मुख्यमंत्री राहतील. ज्याचे जास्त खासदार त्याची सत्ता असते. जनता आमच्यासोबत आहे, असा दावा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला. हवेची दिशा मी पाहत नाही, माणसे पाहून, पक्ष पाहून मी काम करतो, असेही ते म्हणाले.
पुण्यात गणेश कला क्रीडा मंच येथे पणन मंडळाच्या वतीने मिलेट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उद्घाटनानंतर सत्तार यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंगळवारी उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषद घेऊन अनेक धक्कादायक दावे केले. तसेच एकतर्फी निर्णय दिल्याचा आरोप केला. त्यावर सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आरोपात तथ्य नाही. युती का तोडली याचे उत्तर ठाकरे यांनी द्यावे.
आजही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री, आम्ही दैवत मानतो. तर उद्धव ठाकरे संभ्रम निर्माण करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. ते आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. मात्र न्यायालय आम्हाला न्याय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेवढे संख्याबळ आमच्याकडे आहे तेवढेच संख्याबळ अजितदादा यांच्याकडे आहे. त्यामुळे आमच्यासारखाच निर्णय अजित पवार यांच्याबाबत लागेल असे वाटते, असेही सत्तार म्हणाले. हातकणंगले लोकसभा शिवसेनेची आहे, तिथे आमचे खासदार धैर्यशील माने आहेत. त्यामुळे हातकणंगलेची जागा सदाभाऊ यांनी मागण्याचा संबंधच येत नाही, असा दावा त्यांनी केला.