ध्यास विश्वसार्ह बातमीचा

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना पार्श्वभूमीवर अक्कलकोटमध्ये आज शोभायात्रा

आमदार कल्याणशेट्टींनी केली प्राचीन राम मंदिराची साफसफाई

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या उत्साहाचा माहोल आहे. यानिमित्त तालुक्यात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान संचलित स्टेशन रोड वरील श्रीराम मंदिरात अभिषेक, भजन, नामस्मरण,प्रसाद वाटप आदी कार्यक्रमांसह श्रीराम मंदिरात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवेचे आयोजनही करण्यात आले आहे.

आज दुपारी ४ ते ६ या वेळेत गायक मनोहर देगावकर (संगीत अलंकार) यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन सेवा पार पडणार आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार सचिन कल्याणशेट्टी,महेश हिंडोळे आदिंसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी अक्कलकोट येथील प्राचीन श्रीराम मंदिरात साफसफाई केली.पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळत असून कार्यकर्त्यांनी आपापल्या गावातील मंदिरे स्वच्छ करावीत,असे आवाहन त्यांनी यावेळी केले.त्याशिवाय अक्कलकोट शहरातून श्रीराम प्राणप्रतिष्ठापणेनिमित्त दुपारी साडेतीन वाजता भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे याचा प्रारंभ मल्लिकार्जुन मंदिर अक्कलकोट येथून दुपारी साडेतीन वाजता होणार आहे यावेळी कार सेवकांचा सन्मान सोहळा पार पडेल तसेच सायंकाळी साडेसहा वाजता फत्तेसिंह क्रीडांगणासमोर असलेल्या राम मंदिरात व तारामता उद्यान कारंजा चौक येथे दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याशिवाय सायंकाळी सात वाजता राम मंदीरामध्ये प्रसादाचे आयोजन श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे. कुरनूर येथील दत्त मंदिर समितीच्यावतीने भजन,भारुड ,महाप्रसाद यासह विविध धार्मिक कार्यक्रमांचा आयोजन करण्यात आल्याची माहिती मंदिर समितीने दिली आहे. तरी जास्तीत जास्त भाविकांनी प्रभू श्रीरामांच्या दर्शनासह, धार्मिक कार्यक्रम व गायनसेवेचाही लाभ घ्यावा,असे आवाहन श्री राम प्राणप्रतिष्ठापना सोहळा समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!