नाशिक : वृत्तसंस्था
नाशिक ही प्रभू श्रीरामचंद्रांच्या पराक्रमाची भूमी आहे. जेव्हा जेव्हा संकट आले तेव्हा तेव्हा प्रभू राम, कृष्ण आणि आदिमाया तुळजाभवानीने अवतार घेतले आहेत. सध्या महाराष्ट्राला लुटले जात आहे. हे संकट परतवून लावण्यासाठी माझ्यासमोर सभेला उपस्थित असलेले काळस्वरूप रामाचे विराट रूप आहे, अशी भावना व्यक्त करतानाच महाराष्ट्राला वाचवण्यासाठी ‘आई दार उघड बये दार’ अशी साद शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घातली. शंभर दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा, अशा शब्दांत ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उत्साहित केले.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशकात मंगळवारी पार पडले. त्यानंतर आयोजित जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी आपल्या ठाकरी भाषेत भाजपसह शिंदे गटाचा खरपूस समाचार घेतला. बीजेपी म्हण्जे भेकड़ जनता पार्टी असल्याची टीका करीत ठाकरे म्हणाले, आम्ही श्रीरामाच्या मंदिरास कधीही विरोध केलेला नाही. आमचे हिंदुत्व बेगडी नाही. हिंदुत्वाच्या प्रत्येक मुद्द्यावर भाजपची पाठराखण केली. भाजपच्या एकाही नेत्याने वादग्रस्त ढाचा पाडल्यानंतर त्याची जबाबदारी घेतली नव्हती, तेव्हा ती जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारली. शिवसेनेने पहिल्यांदा हिंदुत्वावर निवडणूक जिंकली आणि भाजपला दिशा दाखवली.
मी बाळासाहेबांचे विचार सोडले असे तुम्हाला वाटते काय? जर तुम्हाला तसे वाटत असेल तर आज या क्षणी मी मुख्यमंत्री पद जसे सोडले तसे पक्षाध्यक्ष पद सोडतो, असे ठाकरे यांनी जाहीर करताच उपस्थितांनी ‘नाही नाही’ असा घोष करीत ठाकरे यांचे समर्थन केले.
मी पंतप्रधान मोदी यांचा व्यक्तिशः विरोधक नाही. मी त्यांच्या विचारांचा व नीतीचा विरोधक आहे. एक विधान, एक निशाण आणि एक प्रधान या नीतीच्या नावाखाली भाजपला हुकूमशाही आणायची आहे. आता एक विधान असेल ते फक्त संविधान, एक निशाण असेल तो फक्त तिरंगा आणि एक प्रधान असेल तो ईव्हीएमचा धिक्कार करीत जनतेने निवडून दिलेला, असे ठणकावत ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. नेतृत्वास पर्याय म्हणून भाजपत जो चेहरा पुढे येतोय त्यास संपवले जात आहे. त्याचा फटका मध्य प्रदेशमध्ये शिवराजसिंग चौहान यांना बसला, आता योगी आदित्यनाथ तुम्ही सावध व्हा, असा सल्लाही ठाकरे यांनी दिला.