ऐझल : वृत्तसंस्था
म्यानमारच्या लष्करातील एक विमान मंगळवारी मिझोरमची राजधानी ऐझल येथील लेंगपुई विमानतळावर अपघातग्रस्त झाले. म्यानमारमधील जातीय संघर्षात घडलेल्या चकमकीनंतर सीमा ओलांडून भारतात आलेल्या आपल्या सैनिकांना मायदेशी नेण्यासाठी हे विमान मिझोरममध्ये आले होते. याचदरम्यान ते अपघाताचे शिकार झाले. यात, किमान ८ जण जखमी झाले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, म्यानमारच्या लष्कराचे छोटे विमान लेंगपुई विमानतळावर लँडिंग होत असताना घसरले. धावपट्टीवर उतरताना विमान पुढे निघून गेले. त्यामुळे ते अपघाताचे शिकार झाले. मंगळवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांच्या सुमारास हा प्रकार घडला. हा अपघात एवढा भीषण होता की, त्यात विमानाचे मध्य भागातून दोन तुकडे झाले. या घटनेत विमानातील १४ पैकी ८ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी लेंगपुई प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे, अशी माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी दिली. उल्लेखनीय बाब अशी की, गेल्या १७ जानेवारी रोजी म्यानमारचे २७६ सैनिक मिझोरममध्ये घुसले होते. यापैकी १८४ जणांना नुकतेच मायदेशी रवाना करण्यात आले. उर्वरित ९२ सैनिकांना घेऊन जाण्यासाठी म्यानमारने विमान पाठवले. हे विमान सैनिकांना घेऊन हिंसाग्रस्त राखीने प्रांतातील सितवे येथे जाणार होते. परंतु ते दुर्दैवाने अपघाताचे शिकार झाले.
दरम्यान, म्यानमारच्या विमान अपघाताची चौकशी करण्याचे आदेश नागरी उड्डयण महासंचालनालयाने (डीजीसीए) दिले आहेत. या अपघातानंतर लेंगपुई विमानतळावरील अनेक विमानांचे मार्ग बदलले आहेत. येथील विमान सेवा पूर्ववत होण्यासाठी एक दिवस लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.