मुंबई : वृत्तसंस्था
राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या सर्वच मागण्या मान्य केल्या. त्यामुळे मराठा समाजाला ओबीसीत हक्काचे आरक्षण मिळाल्याचा दावा केला आहे. सरकारच्या निर्णयानंतर जरांगेंनीही आपली आंदोलनाची तलवार म्यान केली आहे. पण आता जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठा समाजाच्या हाती नेमके काय लागले? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ओबीसी नेत्यांनी याविषयी केलेल्या विधानांमुळे हा प्रश्न चर्चिला जात आहे. विशेषतः महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या एका ट्विटमुळे हा प्रश्न अधिकच चव्हाट्यावर आला आहे.
मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने त्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या. आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांचे कौतुक करत त्यांना टोमणाही हाणला आहे.
आरक्षण केव्हा मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा
राज ठाकरे यांनी शनिवारी एका ट्विटद्वारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे कौतुक केले आहे. तसेच त्यांना मराठा समाजाला आरक्षण केव्हा मिळणार हे मुख्यमंत्र्यांना विचारा असा उपरोधिक टोलाही हाणला आहे. श्री. मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा, असे राज ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.