मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत देखील मोठी फुट पडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या संघर्षावर मोठा निकाल दिला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मंगळवारी सायंकाळी चिन्ह आणि पक्षाबाबतचा निकाल अजित पवार गटाच्या बाजूने दिला आहे. आयोगाचा निकाल हा शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह मिळवून देण्यात अदृश्यशक्तीचा हात, अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांनी दिल्लीत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी सुळे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अदृश्यशक्ती त्यांचं हे यश आहे. कारण ज्या व्यक्तीने पक्ष स्थापन केला. त्यांचा हातातून पक्ष काढून घेणे हे पहिल्यांदा झालं असेल. मला काही आश्चर्य वाटत नाही. कारण हे अपेक्षित होतं. हे महाराष्ट्राच्या विरोधात षडयंत्र आहे. ‘शिवसेना मराठी माणसांचा पक्ष, त्यांच्यासोबत असंच केलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा मराठी माणसांचा पक्ष. अदृश्यशक्ती सातत्याने महाराष्ट्राच्या विरोधात निर्णय घेत असते. त्याचं उदाहरण आहे. त्यामुळे आश्चर्य वाटत नाही’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.