ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नकारात्मक शक्ती दूर करून राज्य सकारात्मक दृष्टीने ; मुख्यमंत्री शिंदे

ठाणे : वृत्तसंस्था

कुठला डाव कधी टाकायचा, कधी कोणाला पायचित करायचे, हे आपल्याला ठाऊक आहे. दीड वर्षापूर्वी आपण असाच एक कार्यक्रम केला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. ठाणे शहरातील तालुका क्रीडा संकुलचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यातील नकारात्मक शक्ती दूर सारून राज्य सकारात्मक दृष्टीने वाटचाल करीत असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यात नवनवीन खेळाडूंना आपले कसब दाखवण्याची संधी मिळेल आणि त्यातून चांगले खेळाडू आपल्या जिल्ह्याचे, राज्याचे आणि देशाचे प्रतिनिधित्व करतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. तालुका क्रीडा संकुलाचे काम मागील काही वर्षे रखडले होते. मात्र आज हा प्रकल्प पूर्ण झाला असल्याचा आनंद आहे. ठाण्याला खेळ आणि खेळाडू यांच्या विजयाचा मोठा इतिहास आहे. देशात आणि राज्यात नावाजलेले अनेक खेळाडू ठाण्यात आजवर झालेले आहेत. ठाणे तालुका क्रीडा संकुलात काळाची गरज ओळखून अत्याधुनिक सुविधांसह खेळाडू घडवण्याचे काम होणार आहे. जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये जिद्द, चिकाटी आहे त्यामुळे येथील सोयी-सुविधा या त्यांच्या फायद्याच्या ठरणार आहेत. राज्यात आता नवीन फिटनेस पिढी तयार होत आहे, राज्य शासन देखील खेळाडूंसाठी नवनवीन सुविधा देत आहे, त्यांच्यासाठी वाढीव निधीची तरतूदही करण्यात आली. तसेच खेळातील बक्षीस रकमेतही वाढ करण्यात आली आहे.

आपण पालकमंत्री असल्यापासून खेळासाठी काम करत आहोत, येत्या काळात जिल्ह्यातून नवीन खेळाडू तयार होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. दादोजी कोंडदेव स्टेडियमची पांढरा हत्ती ही ओळख आता पुसली गेली आहे. याठिकाणी आता रणजीचे सामने देखील होत आहेत. ठाणे जिल्ह्याला खेळाचा जुना इतिहास आहे. मात्र आता काळ बदलला आहे, पूर्वी खेळात निवडक संधी होत्या आता अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे निश्चित ही चांगली बाब असल्याचेही ते म्हणाले. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे मनपा आयुक्त अभिजीत बांगर, क्रीडा उपसंचालक नवनाथ फरताडे, तहसीलदार युवराज बांगर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के यांच्यासह अन्य उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!