मुंबई : वृत्तसंस्था
वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे राज्यातील कायदा-सुव्यवस्था ढासळली असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी केंद्र सरकारकडे शिफारस करा, अशी मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने शनिवारी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री आरिफ नसीम खान, प्रदेश कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, सुरेंद्र राजपूत, संजय राठोड आदींचा शिष्टमंडळात समावेश होता. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले, महाराष्ट्रात गुंडाराज सुरू असून बंदुकीच्या धाकाने दबावतंत्र चालवले जात आहे, जाती-धर्मात भेद निर्माण केला जात आहे.
राज्यात कायदा-सुव्यवस्थेची परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. मागील दोन महिन्यातील घटना महाराष्ट्राची प्रतिष्ठा, नावलौकिक धुळीस मिळवणाऱ्या आहेत. राज्यपालांनी याची गंभीर दखल घ्यावी आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याची शिफारस केंद्र सरकारला करावी, अशी मागणी राज्यपालांकडे केली आहे.