ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप नेत्याचा दावा : वडेट्टीवार देखील येणार भाजपच्या तंबूत

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील कॉंग्रेस पक्षातून एक एक नेते बाहेर पडून भाजपात दाखल होत आहे. नुकतेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा ‘हात’ धरला आहे. काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या महिनाभरात हा तिसरा मोठा धक्का बसला आहे. आधी मुंबईतून माजी खासदार मिलिंद देवरा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर माजी मंत्री बाबा सिद्धिकी यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.

मात्र काँग्रेस आणि महाविकास आघाडीचीही चिंता इथेच कमी होत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘आगे आगे देखो होता है क्या?’ या वक्तव्याचा नेमका अर्थ काय असा प्रश्न आता काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाला पडला आहे. त्यातच आमदार रवी राणा यांनी एक मोठा दावा केला आहे. त्यामुळे काँग्रेसची डोकेदुखी आणखी वाढली आहे.

अशोक चव्हाण हे अनेक दिवसापासून भाजपच्या संपर्कात होते. अशोक चव्हाण यांच्यासोबत अनेक काँग्रेसचे आमदार संपर्कात आहेत. येणाऱ्या काळात एक मोठा स्फोट काँग्रेसमध्ये होईल, असा दावा आमदार रवी राणा यांनी केला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार आहेत. विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता असले तरी त्यांचं काय सुरू आहे ते मला माहीत आहे, असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा देखील रवी राणा यांनी केला आहे. मात्र विजय वडेट्टीवार यांनी हे सर्व दावे खोडून काढले आहेत. आपण काँग्रेस सोडून कुठे ही जाणार नसल्याची विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!