ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कॉंग्रेसने बोलविली बैठक : ७ आमदार अनुपस्थित

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील कॉंग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी गेल्या दोन दिवसाआधीच भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना भाजपतर्फे उमेदवारी देण्यात आली आहे. त्यानंतर आता काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांना राज्यसभेचे तिकीट दिल्यानंतर दि.१५ रोजी विधिमंडळात तातडीची आमदारांची बैठक बोलावली. या बैठकीला काँग्रेसचे फक्त 36 आमदारच उपस्थित होते. बैठक संपली तरी 7 आमदार आले नाहीत. त्यातील काही आमदारांनी बैठकीला न येण्याचं कारण कळवलं आहे. यातीलच अशोक चव्हाण समर्थक तीन आमदारही आले नाहीत.

काँग्रेसच्या बैठकीला आज मोहन हंबर्डे, जितेश अंतापूरकर, माधवराव जळगावकर उपस्थित राहणार नव्हते, अशी माहिती पटोले यांनी दिली. आमची बैठक ही नियोजित आहे. एका सहकाऱ्याच्या मुलाचे लग्न आहे, तर दोन सहकाऱ्यांनी आम्हाला याबद्दल कळवल्याचे पटोले यांनी सांगितले.

जितेश अंतापूरकर, माधवराव जवळगावकर, अस्लम शेख, झिशान सिद्दिकी, मोहन हंबर्डे, अमित देशमुख आदी आमदार बैठकीला गैरहजर होते. आणखी एक आमदार वाटेत असल्याचा निरोप आला. काही आमदारांनी बैठकीला न येण्याचे कारण कळवले. पण तीन आमदारांनी काहीच कळवले नसल्याचे सांगितले जात आहे. हे तिन्ही आमदार अशोक चव्हाण यांचे समर्थक असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसचे तीन आमदार आहेत काय? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे. दरम्यान आमदार जितेश अंतापूरकर बैठकीनंतर आल्याचे समजते.

काँग्रेसचे पक्षनिरीक्षक नांदेडमध्ये होते. त्यामुळे आमदार मोहन हंबर्डे या बैठकीला गेले नसल्याचे समजते. तर के. सी. पाडवी यांच्या दिवंगत वडिलांचा धार्मिक कार्यक्रम असल्याने ते बैठकीला उपस्थित नव्हते. त्यांनी तसे अध्यक्षांना मेलवर कळवले होते. तर अमरावतीच्या आमदार सुलभा संजय खोडके यांच्या कुटुंबात विवाह सोहळा होता. याबाबत त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांना कळवले होते. या आमदारांनी आम्ही काँग्रेस सोबत असल्याचेही सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!