ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बारामतीत कोणीही उभे राहू शकते – शरद पवार

बारामती : वृत्तसंस्था

लोकशाहीमध्ये कोणीही निवडणूक लढवू शकते. प्रत्येकाला तो अधिकार आहे. मात्र तो अधिकार जर कोणी गाजवत असेल, तर तक्रार करण्याचे काहीही कारण नाही, असे स्पष्ट मत खासदार शरद पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवर व्यक्त केले.

पक्ष व चिन्ह गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आज पहिल्यांदा बारामती आले होते. त्यांच्या बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्ष व चिन्ह गेल्याबाबत भाष्य केले.

पवार म्हणाले की, आपण आपली भूमिका लोकांच्या समोर मांडावी. मागील ५५ वर्षे आम्ही काय केले, हे लोकांना माहीत आहे. बारामतीत उभ्या असलेल्या संस्था कधीपासून आहेत. उदा. विद्या प्रतिष्ठान संस्था स्थापन होऊन ५४ वर्षे झाली. कृषी विकास प्रतिष्ठान संस्था १९७१ साली स्थापन झाली. आज आरोप करणाऱ्यांचे वय त्या वेळी काय होते, याचे कॅल्क्युलेशन त्यांनी केले, तर त्यांच्या व लोकांच्याही लक्षात येईल. अशी भूमिका मांडणे कितपत योग्य आहे, ते असे ते म्हणाले.

माझ्या विचाराचा खासदार निवडून दिला नाही, तर विधानसभेला मी वेगळा विचार करेन, असे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत व्यापारी मेळाव्यात म्हणाले होते. यावर पवार म्हणाले, प्रत्येकाचा व्यक्तिगत विचार असू शकतो. भावनात्मक अपील आमच्याकडून करण्याचे काही कारण नाही. बारामती मतदारसंघाचे लोक आम्हाला वर्षानुवर्षे ओळखत आहेत. त्यामुळे आम्ही भावनात्मक अपील करणार नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!