ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने ११ धावांनी विजय मिळवला आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाने आश्वासक सुरुवात केल्यानंतर मधल्या षटकांमध्ये हाराकिरी केली. रविंद्र जाडेजाऐवजी बदली खेळाडू म्हणून आलेल्या चहलच्या फिरकीच्या जाळ्यात कांगारु अकडले. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे.
वन-डे मालिका गमावल्यानंतर भारतीय फलंदाजांचं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात निराशाजनक कामगिरीचं सत्र सुरुच राहिलं आहे. पहिल्या टी-२० सामन्यात सलामीवीर लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळी आणि रविंद्र जाडेजाच्या फटकेबाजीच्या जोरावर टीम इंडियाने १६१ धावांपर्यंत मजल मारली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांवर अंकुश ठेवत त्यांना मोठे फटके खेळण्याची संधीच दिली नाही. परंतू जाडेजाने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करत टीम इंडियाला आश्वासक धावसंख्येचा टप्पा ओलांडून दिला. महत्वाच्या क्षणी जाडेजाने २३ चेंडूत ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ४४ धावा केल्या.