ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवारांनी केले मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचे कौतुक

बारामती : वृत्तसंस्था

देशभरात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारतर्फे अनेक योजना जाहीर करण्यात येत आहे. त्यासाठी बारामतीमधील नमो महारोजगार मेळावा देखील आयोजित करण्यात आला आहे. यावेळी शरद पवारांनी वक्तव्य केले आहे.

बारामती येथे विद्या प्रतिष्ठाणच्या संस्थेत नमोरोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, नीलम गोऱ्हे इत्यादी नेते उपस्थित होते. शरद पवार यावेळी आपल्या भाषणात म्हणाले की, राज्याची रोजगार निर्मिती करण्याची क्षमता आहे. या मुद्द्यावर आमची सरकारला साथ असेल.

शरद पवार म्हणाले की, विद्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक तरुण- तरुणींना नोकऱ्या मिळाल्या. देशात मोठ्या प्रमाणाच बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हाच प्रश्न ओळखून आता सरकार तरुणांना नोकऱ्या देण्याचे ठरवले आहे. तरुणांना रोजगार मिळावा म्हणून प्रयत्न केले. त्यासाठी मी त्यांचे अभिनंदन करतो आणि आभार देखील मानतो.

शरद पवार म्हणाले की, आतापर्यंत विद्या प्रतिष्ठानच्या मार्फत अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांची मदत घेतली आहे. आता विद्या प्रतिष्ठानमधे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे पहिले महाविद्यालय सुरु होत आहे. राजकारण आपल्या जागी होत असते. पण तरुणांना नवीन रोजगार देण्यासाठी सर्वांनी एकत्र यायला हवे. मी मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्यांना खात्री देऊ इच्छितो की विकासासाठी आम्ही सदैव तुमच्या पाठिशी राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!