मुंबई : वृत्तसंस्था
देशातील आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरुवात केली आहे. सध्या अनेक जिल्ह्यांमध्ये ठाकरे गटाच्या वादळी सभा होत आहेत. आज दि.४ रोजी उद्धव ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते मावळ, पनवेल आणि उरणमध्ये जंगी सभा घेणार आहेत. मात्र, त्यांच्या दौऱ्यापूर्वीच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाच्या उरण तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी रविवारी (३ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यात नवघर, उरण, उलवे तसेच इतर विभागातील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही नक्कीच वाईट बातमी आहे.
उरण तालुक्यातील ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील शुभदीप या निवासस्थानी भेट घेतली आणि शिवसेनेत प्रवेश केला. त्यांच्या शिवसेना प्रवेशामुळे उरणमधील शिंदे गटाची ताकद वाढली असून ठाकरे गटाची ताकद घटली आहे. शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांमध्ये नवघर पंचायत समितीचे सदस्य दीपक ठाकूर, उरण पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत पाटील, उलवे नोडचे शहरप्रमुख प्रथम पाटील, शाखाप्रमुख विजय भिसे आणि युवासेनेचे क्षितिज शिंगरे आदींचा समावेश आहे.