मुंबई : वृत्तसंस्था
अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप करून, ईडीची नोटीस देऊन भारतीय जनता पक्षाच्या वाढीचे काम करण्यात येत आहे. आता थांबा, तुम्ही ईडीची नोटीस द्या, आम्ही तुम्हाला हद्दपारीची नोटीस देऊ, अशा शब्दांत शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे जाहीर सभेतून भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘अब की बार, भाजप तडिपार’ अशी घोषणा त्यांनी यावेळी दिली.
उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मावळ मतदारसंघाचा दौरा केला. याअंतर्गत बऱ्याच कालावधीनंतर त्यांची खोपोली येथे जाहीर सभा झाली. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठा उत्साह संचारला होता. या सभेस शिवसेनेचे नेते संजय राऊत, आमदार सचिन अहिर, शेकापचे चिटणीस जयंत पाटील, मिलिंद नार्वेकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, मावळचे पक्षसंघटक संजोग वाघेरे पाटील, बबन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ही निवडणूक प्रचारसभा नाही. हा कुटुंब संवाद आहे. या कुटुंबामध्ये रोज नवनवीन, विविध विचारांचे लोक सामील होत आहेत. आपण सारे सध्या देश आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र आलो आहोत. भाजपला राज्यात कोणीही विचारत नव्हते. त्यांना आम्ही महाराष्ट्र दाखवला. पण भाजपने सारे नासून टाकले.