मुंबई – राज्यात नुकत्याच पार पडलेल्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारत भाजपला जोरदार धक्का देत घवघवीत यश मिळवले आहे. यानंतर महाविकास आघाडीतील नेते व भाजप यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दरम्यान, यावरून शिवसेनेने भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपाला सणसणीत टोला लगावण्यात आला आहे. “आम्ही सर्वशक्तिमान आहोत, आम्ही एकटेच लढणार आणि जिंकणार ही खुमखुमी चंद्रकांत पाटलांची होती, ती चांगलीच जिरली आहे.” असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील पाच जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. धुळे-नंदुरबार विधान परिषदेची जागा काँग्रेसमधून भाजपात शिरलेल्या अमरीश पटेल यांनी जिंकली. अमरीश पटेल यांची अशा प्रकारच्या निवडणुका जिंकण्याची कार्यपद्धती किंवा कौशल्य ज्यांना माहीत आहे ते या विजयाचे श्रेय भारतीय जनता पक्षाला देणार नाहीत. पदवीधर, शिक्षक मतदारसंघ म्हणजे भारतीय जनता पक्षाचीच मक्तेदारी होती. शिकले-सवरलेले, सुशिक्षित, सारासार विचार करणारे मतदार हे भाजपलाच मतदान करतात या भ्रमाचा भोपळा आता फुटला आहे. शिक्षक, पदवीधरांनी महाराष्ट्रात सर्वत्र महाविकास आघाडीलाच मतदान केले,असंही शिवसेनेन म्हटल आहे.
‘महाविकास आघाडीचे सरकार हे अनैसर्गिक आहे, त्यांना जनतेचा पाठिंबा नाही असे बोलणाऱ्यांनी शिक्षक-पदवीधरांनी दिलेल्या निकालाकडे जाड भिंगाचा चष्मा लावून पाहावे,’ असं शिवसेनेनं सुनावलं आहे. ‘वर्षभरापूर्वी १०५ आमदार येऊनही सत्ता गेली. तेव्हापासून महाराष्ट्र भाजपास सुतक लागले. कालच्या नागपूर-पुण्यातील पराभवाने आणखी एक सुतक लागले. एका वर्षात दोनदा सुतक लागणे हे हिंदू शास्त्रानुसार चांगले नाही. भाजपला काहीतरी तोड करावीच लागेल,’ अशीही तिखट टीकाही शिवसेनेनं केली आहे.