मुंबई : वृत्तसंस्था
आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर आज रात्री शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रवींद्र वायकर शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सीएम निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर जाहीर प्रवेश सोहळा रात्री 8 वाजता पार पडणार आहे.
रवींद्र वायकर यांच्यावर जोगेश्वरीतील कथित घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांची ईडीची चौकशीही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतयांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करुन, रवींद्र वायकरांना ईडी धमकावत असल्याचं म्हटलं होतं. तसेच, रवींद्र वायकरांना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी दबाव असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं होतं. अशातच आता थेट रवींद्र वायकरांच्या शिवसेना प्रवेशाचं वृत्त समोर येत आहे.
दरम्यान, आतापर्यंत ठाकरेंच्या पाठीशी ठामपणे उभे असणारे वायकर एकाएकी शिवसेनेत प्रवेश करणार असल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. तसेच, रवींद्र वायकरांच्या रुपात उद्धव ठाकरेंना आतापर्यंतचा सर्वा मोठा धक्का बसणार असल्याचं बोललं जात आहे.
जोगेश्वरी भूखंड घोटाळाप्रकरणी ईडीच्या रडारवर असलेले ठाकरे गटाचे आमदार आणि उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी रवींद्र वायकर हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा होती. या आमदाराने एकनाथ शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याचीही चर्चा होती. मात्र, हा आमदार नेमका कोण, हे समजू शकले नव्हते. मात्र, आता आमदार रवींद्र वायकर असल्याची माहिती समोर येत आहे. यापूर्वी ईडीने आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात रवींद्र वायकर यांची चौकशी केली होती. गेल्या महिन्यात रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीने धाडही टाकली होती. त्यानंतर आता रवींद्र वायकर आता शिंदे गटात प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. रवींद्र वायकर यांच्यासोबत स्थानिक शिवसैनिकही शिंदे गटात जाण्याची शक्यता आहे. वायकर यांनी सर्व नगरसेवक, शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांना तयारीत राहण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.