मुंबई : वृत्तसंस्था
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांनी माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांसह रविवारी रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत वर्षा निवासस्थानी प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय व विश्वासू म्हणून वायकर यांची ओळख आहे; पण गेल्या काही महिन्यांपासून जोगेश्वरी भूखंड प्रकरणात वायकर यांच्याभोवती ईडीने फास आवळल्यानंतर अखेर ठाकरेंची साथ सोडत शिंदेंसोबत जाण्याचा निर्णय घेतला. गेला महिनाभर वायकर शिंदे गटात जाणार, अशी चर्चा होती. वायकर यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर महापालिकेने न्यायालयात वायकरांच्या बाजूने प्रतिज्ञापत्र सादर करत त्यांना दिलासा दिला होता.
शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शनिवारी सायंकाळीच जोगेश्वरी, अंधेरी भागात भेटीसाठी पदाधिकाऱ्यांच्या पोहोचले होते. त्यावेळी ठाकरेंसोबत वायकरही सबंध दौऱ्यात उपस्थित होते. मात्र, त्यानंतर २४ तासांतच वायकर यांना ठाकरेंची साथ सोडावी लागली. रविवारी सायंकाळी ७ च्या सुमारास वायकर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या दिशेने रवाना झाले. त्यापूर्वी वायकरांनी जोगेश्वरी क्लब हाऊसमध्ये जात गणपतीची पूजा केली. यावेळी पत्रकारांनी त्यांना गाठले, शनिवारी आपण उद्धव ठाकरेंचे स्वागत केले आणि आज आपण त्यांची साथ सोडत आहात? असा प्रश्न विचारला. यावर, भावूक होत उद्धव ठाकरे माझ्या मतदारसंघात आले तर मी स्वागत करणारच ना? असे ते म्हणाले. यावेळी वायकर यांचा कंठ दाटून आल्याचे दिसले व त्यांचे डोळेही पाणावले; पण त्यानंतर वायकर फारसे न बोलता वर्षा निवासस्थानाकडे रवाना झाले.