मुंबई : वृत्तसंस्था
लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील २० उमेदवारांची पहिली यादी बुधवारी सायंकाळी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, रावसाहेब दानवे, कपिल पाटील, डॉ. भारती पवार या पाच केंद्रीय मंत्र्यांचा या यादीत समावेश आहे. मंत्री पियूष गोयल, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, मुरलीधर मोहोळ यांना पहिल्यांदाच लोकसभेच्या रिंगणात उतरवले गेले आहे. २० उमेदवारांच्या यादीत १३ विद्यमान खासदारांना पुन्हा संधी दिली आहे. यामध्ये ५ महिला उमेदवार असून ५ खासदारांची तिकिटे कापताना ७ नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
लोकसभेसाठी भाजपने मागील पंधरवड्यात १९५ उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली 1 होती. त्यानंतर भाजपने बुधवारी ने सायंकाळी दुसरी यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. यात अपेक्षेप्रमाणे केंद्रीय मंत्री नितीन न गडकरी, रावसाहेब दानवे, कपिल ने पाटील, डॉ. भारती पवार या पाच विद्यमान मंत्र्यांचा समावेश आहे. प्रीतम मुंडे यांच्याऐवजी बीडमधून पंकजा मुंडेंना संधी दिली गेली आहे, तर माजी केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांच्या आजारपणामुळे त्यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव अनुप धोत्रे यांना अकोल्यातून उमेदवारी दिली आहे. २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांचा पराभव झाल्याने त्यांना पुन्हा उमेदवारी नाकारत मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूरमधून लोकसभेच्या मैदानात आणले गेले आहे. मुनगंटीवार हे दिल्लीत जाण्यास इच्छुक नव्हते, पण पक्षाने त्यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या जागेवर पुण्यातून मुरलीधर मोहोळ यांच्यासारख्या तरुण चेहऱ्याला संधी दिली, तर जळगावमधून उन्मेश पाटील यांचा पत्ता कापत माजी आमदार स्मिता वाघ यांना तिकीट दिले. मुंबईतून गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई) आणि मनोज कोटक (उत्तर पूर्व मुंबई) यांची अपेक्षेप्रमाणे तिकिटे कापली आहेत. केंद्रीय मंत्री गोयल यांच्यासाठी शेट्टी यांचे तिकीट कापावे लागले, तर मनोज कोटक यांना डावलून मिहिर कोटेचा यांना संधी दिली गेली आहे. नंदुरबारमधून डॉ. हिना गावित यांना पक्षाने तिसऱ्यांदा संधी दिली आहे. हिना यांच्या उमेदवारीला पक्षांतर्गत तसेच मित्रपक्षांतून विरोध होता. मात्र तरीही पक्षनेतृत्वाने मंत्री विजयकुमार गावित यांची कन्या हिना यांना उमेदवारी दिली आहे.