ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात घेतली परिवहन अधिकाऱ्याने ४ हजारांची लाच

सोलापूर : प्रतिनिधी

बस डेपोतून केलेली बदली रद्द करण्यासाठी चार हजाराची लाच स्वीकारणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेंद्र शिवाजीराव टापरे (वय ४५, पद- सुरक्षा व दक्षता अधिकारी, राज्य परिवहन विभाग सोलापूर, वर्ग-२, मूळ रा. सन युनिव्हर्स अपार्टमेंट, फ्लॅट नंबर आय ७०१, नरे पुणे, सध्या रा. शासकीय विश्रामगृह, राज्य परिवहन विभाग, सोलापूर) यास अँटीकरप्शन विभागाने ताब्यात घेतले आहे. यातील तक्रारदार हे – महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ मेस्को या सुरक्षा एजन्सी अंतर्गत सुरक्षा रक्षक या पदावर नोकरीस असून, सध्या ते अक्कलकोट बस आघाडीचे सुरक्षा रक्षक म्हणून नेमणुकीस आहेत.

यातील टापरे याने तक्रारदार यांची अक्कलकोट बस डेपोतून बदली करून त्यांच्या ऐवजी नवीन सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्याबाबत लेखी पत्र (नोटीस) दिले. त्यामुळे तक्रारदार हे टापरे यास भेटून सदरची नोटीस रद्द करणेबाबत विनंती केली असता, टापरे याने तक्रारदार यांना सदरची नोटीस रद्द करण्याकरिता ५००० रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती ४००० रुपये लाचेची रक्कम स्वतः स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात येऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!