मुंबई : वृत्तसंस्था
देशभरात लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरु झाली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार आता घोषित होण्याच्या तयारीत असतांना अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी भाष्य केले आहे.
भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे. त्यामुळे आता घरातूनच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा विरोध झाला आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून घराबाहेर काढायचं नसते असे म्हणत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्या बंडाच्या भूमिकेवरूनही त्यांना खडेबोल सुनावले आहेत. बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले.
यावेळी बोलतांना श्रीनिवास पवार म्हणाले की, “तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा?, मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हटले आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्यावर उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत”.
यावेळी श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. ”जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नाही. आपण औषध विकत आणतो तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. आता वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही, जगायचं तर स्वाभिमानाने”, अशी भावना श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केली. पुढे ते म्हणाले, ”ज्यांना पदे मिळाली ती फक्त शरद पवार साहेबांमुळे मिळाली. त्याच साहेबांना आपण म्हणतो, आता तुम्ही घरी बसा, कीर्तन करा. हे माझ्या मनाला पटत नाही. कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्यांच्या मागे जावे मला पटत नाही, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता म्हटले आहे.