मुंबई : वृत्तसंस्था
वातावरणातील बदल आणि अल्प पर्जन्यमान यामुळे यंदा डाळींचे उत्पन्न कमी झाले आहे. परिणामी आवक कमी आणि मागणी जास्त अशी स्थिती बाजारात दिसून येत आहे. त्यामुळे सर्वच डाळींचे दर वाढले आहेत. त्यातच एप्रिलमध्ये येणाऱ्या नव्या डाळींचे उत्पादन कमी होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षभर डाळींचे गणित गृहिणींसाठी कसरतीचे राहणार आहे.
डाळींच्या वाढत्या किमती महागाईसाठी कारणीभूत ठरत आहे. देशातील सर्व जनतेला पुरेल इतक्या कडधान्यांचे उत्पादन होत नसल्यामुळे देशाला डाळींची आयात करावी लागते. गेल्यावर्षी डाळींचे पीक चांगले आले नाही. यावर्षी तर दुष्काळ असल्यामुळे उत्पादनावरही चांगलाच फटका बसला. त्यामुळे आगामी वर्षभर तरी डाळींच्या किमती गगनाला भिडणाऱ्याच राहतील, असा अंदाज आहे. नवीन हंगाम एप्रिलमध्ये सुरू होणार असला तरी आवक किती प्रमाणात होते, त्यावर किमती अवलंबून राहणार आहेत. असे असले तरी डाळींच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात राहण्याची शक्यता कमीच आहे. या संपूर्ण वर्षभरात मूग, तूर, वाटाणा, हरभरा या कडधान्यांचे दर सातत्याने वाढत आहेत. मसूर डाळीचे दर फक्त स्थिर राहिले आहेत. अख्खा मसूर ६५ ते ८० आणि मसूर डाळ ७० ते ८० रुपये किलोने विकली जात आहे. मध्यंतरी राजकीय नेत्यांनी ६० रुपयांत भारत हरभरा डाळींचे वितरण केले होते. त्यामुळे दिवाळीच्या काळात गृहिणींनी मोठ्या प्रमाणात डाळ खरेदी केली होती. सरकारने जर कडधान्यांची आयात केली, तर कदाचित डाळींचे दर नियंत्रणात राहू शकतील