परभणी : वृत्तसंस्था
जिंतूर-सोलापूर जाणाऱ्या बसचा परभणी येथील अकोली पुलाजवळ भीषण अपघात झाला आहे. बस थेट पुलावरून खाली कोसळली आहे. यात बसमधील २५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांना जिंतूर शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जिंतूरहून सोलापूरकडे जाणाऱ्या बसचा अकोली पुलाजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळं ही बस पुलाच्या खाली कोसळल्याची माहिती मिळतेय. आज सकाळच्या सुमारास ही बस सोलापूरकडे निघाली होती. यामध्ये मोठ्या संख्येने प्रवासी बसलेले होते. त्यावेळी बस अकोली पुलाजवळ आल्यानंतर ही घटना घडली आहे. या अपघातात ड्रायवर, कंडक्टरसह जवळपास 25 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना जिंतूर येथील रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. या ठिकाणी जखमींवर उपचार सुरू आहेत. चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळं अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी जमली आहे.
अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आलं होतं. स्थानिकांच्या मदतीने बसमधील प्रवाशांना बाहेर काढण्यात येत होतं. बस अचानक पुलाखाली कोसळल्यामुळे प्रवाशांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं.