पुणे : वृत्तसंस्था
‘इंडिया’ आघाडीचा घटक म्हणून मी स्वतः अरविंद केजरीवाल यांच्या पाठीशी पूर्ण ताकदीने उभा राहणार आहे. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची शंभर टक्के किंमत सरकारला मोजावी लागेल. लोकसभा निवडणुकीत केजरीवालांच्या सर्व जागा निवडून येतील, असे वक्तव्य खासदार शरद पवार यांनी केले. बारामती येथील गोविंदबाग निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पवार म्हणाले की, लोकशाहीवर आलेले संकट आहे. लोकशाहीप्रती आस्था असलेल्या सर्व लोकांनी एकत्र यावे. आणीबाणीच्या काळात लोकांनी ज्या पद्धतीने सामुदायिक शक्ती दाखवली, तशी शक्ती या निवडणुकीत दाखवतील, असा विश्वास पवार यांनी बोलून दाखवला. केजरीवाल नव्वद टक्के मते मिळवून तीनदा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. याचा अर्थ लोकांना त्यांचे नेतृत्व मान्य आहे. अशा नेत्याला तुरुंगात टाकून लोकशाहीचा अधिकार बजावू देत नाहीत, हे लोकांना कधीच पटणार नाही. केजरीवालांवरील कारवाई ही पूर्णपणे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केली गेली आहे. दिल्लीत बसून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भूमिकेला विरोध करण्याची भूमिका केजरीवाल घेतात. त्यामुळे त्यांना केजरीवाल सहन होत नाहीत. तामिळनाडूतही न्यायालयाने सांगूनही राज्यपाल मंत्र्यांना पुन्हा शपथ देत नाहीत. हा प्रकार दिल्लीतून सांगितल्याशिवाय होऊ शकत नाही. घटनेने असलेले राज्यांचे अधिकार पायदळी तुडवतात. झारखंड व दिल्लीपाठोपाठ इतर ठिकाणीही दहशत निर्माण करून सत्ता आपल्या हाती ठेवणे हेच सरकारचे सूत्र असल्याची टीका पवार यांनी केली.
पवार यांनी सांगितले की, यापूर्वी सभेतून टीका-टिप्पणी केली जात होती. पण लोकशाहीचा अधिकारच बजावू द्यायचा नाही, हे यापूर्वी कधी देशात झाले नव्हते. लोकशाहीचा गळा दाबण्याचे काम सुरू झाले आहे. हे यातून स्पष्ट दिसते. केवळ देशातच नाही, तर स्थानिक स्तरावरही दहशतीचे वातावरण तयार केलेले आहे. दुकाने सील करण्यापासून ते देशस्तरावर अटकेपर्यंत पावले उचलली जात आहेत. यापूर्वी देशात कधीही असे वातावरण नव्हते, असे सांगत राज ठाकरे किती जागा लढवतात हे बघावे लागेल. एक-दोन जागांवर ते लढणार असतील तर त्याचा फारसा परिणाम होणार नाही. समोरच्या जागा जाहीर झाल्या की, आमच्या पक्षात आणखी इनकमिंग वाढेल. तुम्हाला त्या वेळेला समजेल की किती जण आमच्याकडे येतात, असे अत्यंत सूचक वक्तव्य शरद पवार यांनी करत अनेक दिग्गजांचे इनकमिंग होणार असल्याचे संकेत दिले.