छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाजाने बोलावलेल्या बैठकीत तुफान हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती. पण त्यात ऐनवेळी वाद झाला आणि या बैठकीसाठी आलेल्या मराठा जनतेची घोर निराशा झाली.
मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी गावोगावी बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरमधील मराठा मंदिर मंगल कार्यालयात मराठा समाजाची समन्वय बैठक बोलावण्यात आली होती. सकाळी 11 वाजता होणाऱ्या या बैठकीसाठी पंचक्रोशीतील मराठा नागरिक जमले होते. सुरुवातीला ही बैठक शांततेत सुरू होती. पण त्यानंतर अचानक आरोप प्रत्यारोप सुरू झाले. काही जणांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन ही बैठक आयोजित केल्याचा आरोप केला. त्यानंतर बैठकीत एकच वाद सुरू झाला आणि केवळ पुरुषच नव्हे तर महिलाही एकमेकींना भिडल्या.
बैठकीला उपस्थित असणाऱ्या काही जणांनी उमेदवाराचे नाव घेण्यावर आक्षेप घेतला. तसेच आम्हाला विश्वासात न घेता ही बैठक बोलावल्याचाही आरोप केला. यामु्ळे वातावरण तंग झाले. यासंबंधी व्हायरल झालेल्या एका व्हिडिओनुसार, सर्वप्रथम मराठा कार्यकर्ते बाळू औताडे यांनी एका तरुणाला मारहाण केली. त्यानंतर इतरजणही हाणामारीला पुढे सरसावले. यामुळे वातावरण अधिकच बिघडले. त्यानंतर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी काही महिलांमध्ये बाचाबाची झाली. या घटनेमुळे बैठकस्थळी मोठा तणाव निर्माण झाला होता.