पुणे : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून पुण्यातील वसंत मोरे यांनी मनसेला राम राम केल्यानंतर ते राज्यभर चर्चेत आले होते. त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. मोरे हे पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवण्यात इच्छुक आहेत. त्यामुळे या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा झाली असे प्रकाश आंबेडकर यांनी भेटीनंतर म्हंटले आहे. तसेच येत्या दोन चार दिवसात वसंत मोरे आणि महाविकास आघाडी सोबतची समीकरणे याबाबत निर्णय घेईल असेही ते म्हणाले.
या भेटीनंतर मोरे म्हणाले, ”आंबेडकर यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. पुणे लोकसभेच्या निवडणुकीला अजून वेळ आहे. त्या नुसार येणाऱ्या दोन- चार दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल. मी वंचितच उमेदवार असेल का याबाबत प्रकाश आंबेडकर हे निर्णय घेतील”, असे वसंत मोरे म्हणाले.
तर आंबेडकर यांनीही भेटीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे. ”नव्या राजकारणाची सुरुवात कशी होणार आणि ती कोण- कोण करणार याबाबत येत्या दोन चार दिवसात निर्णय जाहीर करणार आहे. काही गोष्टी मी उघडपणे सांगू शकत नाही. कारण अजूनही घटना घडत आहेत. महायुतीसोबतच्या समीकरणावर देखील दोन तारखेला स्पष्ट निर्णय घेणार”, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, वसंत मोरे यांनी आधी महाविकास आघाडीचे नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र महाविकास आघाडीमध्ये पुणे लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत वसंत मोरे उमेदवारी संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.
या भेटीआधी वसंत मोरे म्हणाले होते की, ”आज मी मुंबईला त्यांची भेट घेणार आहे. मागील आठवड्यात भेटीसाठी चर्चा झाली होती. मात्र ती भेट होऊ शकली नाही. आज आंबेडकर यांनी मला भेटीसाठी वेळ दिला आहे. पुण्यातून मी अर्ज भरणारच आहे. मात्र त्या संदर्भात पाठिंब्यासाठी मी आज आंबेडकर यांच्याशी चर्चा करेल.पुण्याचा विकास हेच माझे उद्दिष्ट्ये आहे”, असे वसंत मोरे म्हणाले.