कोल्हापूर : वृत्तसंस्था
लोकसभेच्या हातकणंगले मतदार संघातून वंचित बहुजन आघाडीने जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तर शिवसेनेनेही मशाल चिन्हावरच लढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी पुन्हा चर्चा करून आपल्याला पाठींब्याची मागणी केल्याचे समजते. एवढेच नाही तर शेतकरी वाऱ्यावर सोडून कोणत्याही पक्षात जाणार नाही, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे.
माजी खासदार राजू शेट्टी यांना माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दोन दिवसापुर्वी मशाल चिन्हावरच लढण्याबाबत सांगितले. या पार्श्वभुमीवर शेट्टी यांनी सोमवारी थेट पवार यांच्याशी फोनवर चर्चा केली. ‘तुम्ही मला शब्द दिलाय म्हणून मलाच पाठिंबा द्यावा’ अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी एक पाऊल मागे घेत महाविकास आघाडीचा घटक पक्ष होण्याची तयारीही त्यांनी दर्शवल्याचे समजते.
दरम्यान, शेट्टी यांच्या हट्टी भुमिकेमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून उमेदवार देण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरुडकर यांचे नाव पुढे येत आहे. तर राहूल आवडे यांचेही सेनेच्या उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते.