नवी मुंबई । नव्या कृषी कायद्याला विरोध करीत शेतकरी संघटनांच्या वतीने उद्या 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. दरम्यान या बंदला काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह देशभरातील अनेक विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनांनी समर्थन दिलं आहे. सोबतच अनेक कलाकार, साहित्यिक तसेच खेळाडूंनी देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आता या दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) बंद ठेवण्यात येणार आहे. याशिवाय येथील माथाडी कामगारांनीही उद्या काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शुक्रवारी नवी मुंबईसह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये राज्यभरातून भाजीपाला आणि धान्याच्या गाड्या येतात. त्यानंतर याच बाजारपेठेतून मुंबई आणि लगतच्या परिसरात भाजीपाला व अन्नधान्याचा पुरवठा होतो. मात्र, शुक्रवारी ही बाजारपेठ बंद राहणार असल्याने भाजीपाला आणि इतर गोष्टींची आवकही बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना भाजीपाला आणि इतर आवश्यक गोष्टींचा साठा करून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
देशव्यापी आंदोलनासाठी हाक
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
भारत बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी महाराष्ट्रातही चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. यामुळे दूध-फळ-भाज्यांच्या वाहतुकीवरही बंदी असणार आहे. पण विवाहसोहळे आणि आपत्कालीन सेवांवर कोणतंही बंधन असणार नाही. परंतु, उर्वरित व्यवहार आणि वाहतूक उद्या ठप्प असेल.