सोलापूर : प्रतिनिधी
मध्यम लहरी १६०२ किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे सोलापूर केंद्र आहे, ही उद्घोघोषणा सोलापूर जिल्ह्यातील श्रोत्यांच्या कानी सर्वप्रथम दि.४ एप्रिल १९८६ रोजी पडली. बघता बघता आकाशवाणी आज ३८ वर्षांची झाली. अत्याधुनिक संगणकीय तंत्रप्रणालीचा वापर करून नावीन्याचा ध्यास घेत आपल्या कक्षेतील श्रोत्यांच्या अपेक्षा, आवडी -निवडी जाणून घेऊन दर्जेदार कार्यक्रम सादर करून आकाशवाणी सोलापूर केंद्र श्रोत्यांच्या गळ्यातील ताईत बनले आहे. पूर्वी रेडिओवरच्या मध्यम लहरी १६०२ किलोहर्ट्झवर वर ऐकू येणारे आकाशवाणीचे सोलापूर केंद्र आता थेट आपल्या मोबाइलवरही ऐकायला मिळत आहे. सन २०११ -२०१२ च्या दरम्यान मोबाइलवर ‘एफएम वाहिनी’ ऐकण्याची सोय झाली.आणि आता आकाशवाणीचे सोलापूर केंद्र १०३.४ मेगा हर्ट्झ या एफएमवर ऐकायला मिळत आहे.
● मनोरंजन क्षेत्र आज सर्वोच्च स्थानावर आहे. या क्षेत्रात दररोज नवनव्या माध्यमांची भर पडत आहे. मनोरंजन क्षेत्राची सुरुवात झाली ती कथाकथनाने. पुढे त्याचा साहित्य, नाटय़, रेडिओ, चित्रपट, टीव्ही आणि नंतर संगणक या क्रमाने विकास होत गेला. या प्रक्रियेत एका माध्यमाची जागा दुस-या माध्यमाने घेतली. या माध्यमांपैकी एका माध्यमाने मात्र कायम उभारी घेतल्याचे दिसून आले. ते माध्यम म्हणजे रेडिओ. या माध्यमावर श्रोत्यांनी आणि कलाकारांनी भरभरून प्रेम केले. टीव्हीच्या प्रसारानंतर हे माध्यम काहीसे मागे पडले. एफएम वाहिनींच्या उदयानंतर हे माध्यम पुन्हा पुढे आले. आज तर रेडिओ पुन्हा एकदा एक महत्त्वपूर्ण माध्यम झाले आहे. या माध्यमाचा त्याच्या विविध अंगांनी एक धावता आढावा घेण्याचा हा एक प्रयत्न –
● – आज माणसं जिथं जातात तिथं मोबाइल नेतात, तसा एकेकाळी शहरापासून अगदी खेडेगावा पर्यंतच्या माणसांच्या हाती रेडिओ दिसायचा. रेडिओवरील भूपाळी अन् सकाळच्या बातम्यांनी घरा-घरात सूर्य उजाडायचा. अनेक घरात तर रेडिओवरच्या बातम्या सुरु होण्याआधी उठण्याचा दंडक असायचा. ‘आप की पसंत’ कार्यक्रमात आपल्या माणसासाठी गाणं ऐकवण्यासाठी हजारो पत्र यायची. लोकप्रिय दहा गाणी ओळखण्यासाठी पैजा लावल्या जायच्या.आज टीव्ही मोबाइलवर हवं ते ज्ञान मिळवता येतं, हवं ते गाणं कधीही ऐकता येतं. मात्र विश्वसनीयतेसाठी आजही ओळखली जाते ती रेडिओ म्हणजेच आकाशवाणी.
● – आपल्या घरातली सकाळची सुरुवात ही रेडिओच्या मंगल ध्वनीने सुरू होत असते. भावगीते, भक्तिगीते,संगीत, विचारपुष्प,कृषी सल्ला, सोलापूर जिल्ह्यातील ताज्या घडामोडींचा आढावा “सोलापूर दिनांक”, आपली आवड, सामर्थ्यशाली भारत, सुहाना सफर, लावण्यरंग , आपकी पसंद, मंथन, बालसभा, गुड मॉर्निंग सोलापूर, प्रतिबिंब श्रोत्यांच्या पत्रांना उत्तर आणि इतर गोष्टीची सरमिसळ असलेले अनेक कार्यक्रम सोलापूर आकाशवाणीवर प्रसारित होत असतात.
घराघरात वर्तमानपत्र येण्याआधी सोलापूर दिनांकच्या माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी शहरातल्या नागरिकांना ऐकायला मिळतात ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. यासाठी सोलापूर दिनांकचे सर्वच पत्रकार पहाटेपासूनच झटत असतात. आकाशवाणी माध्यम हे मनोरंजन आणि प्रबोधन या उद्दिष्टांच्या पूर्तीसाठी काम करीत असते. आज या आकाशवाणीला ३८ वर्षे पूर्ण होत आहे. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ या ब्रीद वाक्यानुसार आज ही आकाशवाणी अतिशय जोमाने वाटचाल करते आहे.
आकाशवाणीतील झालेले बदल
सोलापूर आकाशवाणीच्या या प्रवासात अनेक चांगले बदल झाले. आकाशवाणीत पहिल्या तबकडी असायच्या आता त्या जागी संगणक आला आहे. यामुळे कोणत्याही श्रोत्यांनी केलेल्या गाण्यांची फरमाईश ही लगेच पूर्ण करता येते. यापूर्वी श्रोत्यांनी केलेल्या गाण्यांची फरमाईश ही त्या दिवशीच्या कार्यक्रमात लिहून घेतली जात होती आणि ती फरमाईश दुसऱ्या दिवशी पूर्ण केली जात होती. तसेच आता व्हाट्सअपद्वारे आपण आकाशवाणी सोबत संपर्क करणे सहज शक्य झाले आहे. मोबाईलवर रेडिओ ऐकण्याकरिता इयरफोनची आवश्यकता असायची पण आता त्यांची गरज नाही. आता मोबाईलवर न्यूज ऑन.ए.आय.आर. हे ॲप उपलब्ध झाल्याने सोलापूरचे कार्यक्रम जगात कुठेही ऐकायला मिळतात असे अनेक वेगवेगळे बदल आकाशवाणीमध्ये झाले आहेत. अशा या सोलापूर आकाशवाणी ला ३८ वर्ष पूर्ण झाली असल्याने आकाशवाणीत काम करणाऱ्या सर्व वरिष्ठ, कनिष्ठ अधिकारी, निवेदक, तांत्रिक कर्मचारी, कार्यालयीन कर्मचारी, सोलापूर दिनांकचे वृत्तनिवेदक आणि इतर सर्वांना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !!
– पद्माकर कुलकर्णी, वृत्तनिवेदक सोलापूर आकाशवाणी सोलापूर.