ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापुरात कारवाई : ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून १२० गुन्हे नोंदविण्यात आले. याद्वारे ७६० लिटर दारुसह सव्वासहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सविस्तर वृत्त असे कि, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर पथकाने गुरुवारी पंढरपूर मोहोळ रोडवरील पेनूर गावाच्या हद्दीत एका बोलेरो वाहनातून ३६० लिटर व सोलापूर शहराच्या पथकाने शुक्रवारी सात रस्ता परिसरात एका ऑटो रिक्षामधून ४०० लिटर हातभट्टी दारु जप्त केली आहे.

बोलेरो वाहनचालक क्र. एमएच ४५ ए ८५४७ हे चारचाकी वाहन जागीच सोडून पळून गेला. या कारवाईत वाहनातून चार रबरी ट्यूबमध्ये साठवून ठेवलेली ३६० लिटर हातभट्टी दारु व वाहन असा चार लाख एकसष्ठ हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, फरार आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार, दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे व जवान प्रकाश सावंत यांच्या पथकाने पार पाडली.

अन्य एका कारवाईत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सोलापूर शहरातील सात रस्ता परिसरात संजय तुकाराम कांबळे (वय ४४) या इसमास बजाज ऑटोरिक्षा क्र. एमएच १३ सीटी ७७१५ या वाहनातून चार रबरी ट्यूबमधून ४०० लिटर हातभट्टी दारुची वाहतूक करताना अटक केली. त्याच्या ताब्यातून एक लाख साठ हजार किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. ही कारवाई निरीक्षक जगन्नाथ पाटील, दुय्यम निरीक्षक अंजली सरवदे, सहायक दुय्यम निरीक्षक अलीम शेख, जवान चेतन व्हनगुंटी, किरण खंदारे यांच्या पथकाने पार पाडली.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!