मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात उन्हाचा चटका वाढला आहे. मात्र त्यातच वादळी पाऊस आणि गारपिटीला पोषक हवामान तयार झाले आहे. आज विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. तर मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, वाशिम, आणि यवतमाळमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापैकी हिंगोली आणि नांदेडमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
दरम्यान, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी 30 ते 40 वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासात राज्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर हा पाऊस पुढील चार दिवस राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे, मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये तापमानात वाढणार होणार आहे. मुंबईसह रायगड, ठाणे, पालघरमध्ये हवेतील आर्द्रता वाढून उकाडा वाढणार आहे. पुढील 24 तासांत मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. काही ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरणाची शक्यता आहे. मुंबईतील कमाल तापमान सध्या 37 अंश आहे.