पुणे : वृत्तसंस्था
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या ‘यळकोट यळकोट… जय मल्हार’च्या गजरात अवघी जेजुरीनगरी दुमदुमली. सोमवती अमावास्या यात्रेला दोन लाखांहून अधिक भाविकांनी गर्दी केली होती. सोमवार, ८ एप्रिल रोजी दुपारी एक वाजता इनामदार पेशवे यांनी हुकूम दिल्यानंतर घडशी व वीर यांनी ढोलाद्वारे शेडा दिल्यावर खांदेकरी, मानकरींसह ग्रामस्थांनी पालखी उचलली. पुजारी वर्गाने उत्सवमूर्ती पालखीत ठेवून सोमवती यात्रेला सुरुवात झाली. याप्रसंगी देव संस्थानचे प्रमुख विश्वस्त सोंदाडे आणि त्यांचे सहविश्वस्त, सहकार्यवाह सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
यळकोट यळकोट’च्या गजरात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करीत मुख्य महाद्वारातून पालखी पायरी मार्गाने नीरा स्नानाला निघाली. सायंकाळी पाच वाजता कऱ्हा नदीमध्ये उत्सव मूर्तीना स्नान घालण्यात आले. त्यानंतर पुन्हा पालखी गावात आली. सोमवती यात्रा उत्साहात आणि शांततेत झाली.
श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टने पोलीस प्रशासनाच्या मदतीने आणि खांदेकरी, मानकरी, गावकरी तसेच पुजारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली पालखीचे नियोजन केले होते. यंदाची सोमवती भरदिवसा असल्यामुळे कडक उन्हात देव संस्थानतर्फे सर्व खांदेकरी वर्गास पायामध्ये सॉक्सचे वाटप करण्यात आले होते. पालखी मार्गावर जागोजागी भाविकांना व सर्व उत्सव करणाऱ्यांना पाण्याचे नियोजन करण्यात आले होते. मागील वर्षी पाऊस कमी झाल्यामुळे कहा नदीचे पात्र कोरडे होते. त्यामुळे भाविकांना कहा स्नानाचा योग मिळला नाही. प्रशासनाने भविष्याचा विचार करून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि देवस्थानच वतीने करण्यात आली.